बदलापुरात आढळला स्वाइन फ्लूचा पहिला रुग्ण, परदेशातून आलेल्या एका नातेवाईकमुळे महिला डॉक्टरला लागण

कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यानंतर आता जगभरात पुन्हा एकदा स्वाइन फ्लूचा प्रसार वाढू लागलाय. त्यातच ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूर शहरात स्वाईन फ्लूचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. बदलापुरातील एका वयोवृद्ध डॉक्टरला स्वाइन फ्लूची लागण झाली असून परदेशातून आलेल्या एका नातेवाईकमुळे ही लागण झाल्याचे बदलापूर पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. राजेश अंकुश यांनी माहिती देताना सांगितले आहे. स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळल्यानंतर संबंधित रुग्णाच्या परिसरात आरोग्य विभागाने ट्रेसिंग सुरू केले आहे. बदलापूर शहर हे मुंबईजवळील सॅटेलाइट शहारांपैकी एक समजले जाते. कारण, या शहरात मुंबई आणि नवी मुंबईत कामाला जाणारे चाकरमानी सर्वाधिक संख्येने वास्तव्याला आहेत. कोरोना काळात बदलापूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यामुळे स्वाइन फ्लूच्या पार्श्वभूमीवर बदलापूर पालिकेच्या आरोग्य यंत्रणेसह नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.