चिखलोली डम्पिंग विरोधात ग्रामस्थ आक्रमक
चिखलोली डम्पिंग विरोधात ग्रामस्थ आक्रमक
अंबरनाथ : मागील आठ महिन्यांपासून शहराच्या पश्चिम भागातील चिखलोली परिसरातील नगर परिषदेच्या सर्वे नंबर १३२ या जागेवर अंबरनाथ नगरपरिषदेकडून शहरातील घनकचरा टाकत जात आहे. मात्र या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे व कचऱ्याच्या दूषित पाण्यामुळे येथील शेती व नागरिकांचे जीवनमान धोक्यात आले आहे. यामुळे येथील नागरिकांनी हरित लवादासमोर तक्रार दाखल केली होती. त्यानुसार शासनाच्या समितीने मंगळवारी डम्पिंग ग्राऊंडची पाहणी केली. यावेळी येथील ग्रामस्थांनी समिती समोर समस्यांचा पाढा वाचता व हे डम्पिंग ग्राउंड बंधन झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील येथील नागरिकांनी दिला आहे.
मागील अनेक वर्षांपासून पाईपलाईन रोड लगत असलेल्या एका मोकळ्या जागेमध्ये अंबरनाथ नगरपरिषदेच्या वतीने शहरातील कचरा टाकला जात होता. या ठिकाणी कचऱ्याचे मोठे डोंगर देखील तयार झाले होते. दरम्यान या डम्पिंग ग्राउंड च्या समोर सत्र न्यायालयाची इमारत मंजूर झाल्याने व या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंबरनाथ नगर परिषदेने आपले डम्पिंग ग्राउंड स्थलांतरित करून ते नगर परिषदेच्या सर्व्हे नंबर १३२ या ठिकाणी मागील आठ महिन्यापासून सुरू केले होते. मात्र पावसाळ्यात डंपिंगमधून निघणाऱ्या दुषित पाण्या विरोधात स्थानिक नागरिकांनी थेट हरित लवादाचा दरवाजा ठोठावला होता. त्यानुसार लवादात पार पडलेल्या सुनावनीनंतर जिल्हाधिकारी, एमपीसीबी व इतर यांच्या संयुक्त पथकाला डंपिंगची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.. त्यानुसार मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत प्रांत अधिकारी जयराज कारभारी, एमबीसीवी आणि इतर अधिकारी तसेच मुख्याधिकारी, डॉ.. प्रशांत रसाळ यांनी डंपिंग ग्राऊंडला भेट दिली. मात्र डंपिंग परिसरात चिखलोली येथील रहिवासी, जांभुळ येथील ग्रामस्थांनी प्रशासनाला जाब विचारण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
यावेळी पाहणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना स्थानिकांनी घेराव घालत आपली कैफीयत मांडली. डंपिगमुळे आमची शेतीचे पिक घेणे बंद झाले, कुटूंबाचे आरोग्य बिघडले, घरात दिवस-रात्र डास, दुर्गंधी, माशा, घरांची खिडक्या दारे उघडता येत नाही पालिकेच्या डंपिंगमुळे घरात राहणे अवघड झाल्याच्या संतप्त भावना रहिवाशांनी व्यक्त केल्या. त्यामुळे पालिकेने डंपिंगबाबत तात्काळ योग्य त्या उपाय योजना न केल्यास तसेच लवकरच डम्पिंग स्थलांतरीत न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे आता समिती याबाबत हरित लवादा काय अहवाल सादर करते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.