प्रभाकर पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन
बदलापूर :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 80 टक्के समाजकारण आणि गरज पडल्यास 20 टक्के राजकारण करते. बदलापूर बेलवली येथे सुरु करण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यालयात सुध्दा जनतेचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देण्यात येईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी केले. बदलापूर पश्चिम भाग येथील बेलवली गाव या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व मा. ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर पाटील जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटन कार्यक्रमात बोलत होते.
शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठिकठिकाणी जनसंपर्क कार्यालय सुरु करण्यात येत आहे. नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी ही कार्यालय उघडण्यात येत आहेत. नागरीकांनी आपल्या समस्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात आणाव्या आम्ही त्या सोडविण्याचा प्रयत्न करु असेही आशिष दामले यांनी सांगीतले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्तेच नव्हे तर नेत्यांची सुध्दा जनतेशी नाळ जुळलेली आहे. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विविध पक्षातील लोक प्रवेश करीत आहेत त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकतीने नगरपालिका निवडणूक सामोरे जाणार असे यावेळी माजी नगरसेवक प्रभाकर पाटील यांनी आदर्श बदलापूर प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. बदलापूर पश्चिम भागातील मध्यवर्ती ठिकाणी हे कार्यालय उघडण्यात आले असून नागरिकांच्या समस्या सोडवणे हे आमचे प्राधान्य असेल असेही प्रभाकर पाटील यांनी सांगितले.
जनसंपर्क कार्यालय उद्घाटन प्रसंगी ठाणे जिल्हा ग्रामीण सरचिटणीस अविनाश देशमुख, ठाणे जिल्हा युवती अध्यक्ष प्रियंका दामले, मुरबाड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष शैलेश वडनेरे, हेमंत रुमने, युवक अध्यक्ष विनय सरदार, राम लिये, संतोष कदम, संजय कराळे, हर्षाली गायकवाड यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने हजर होते.