50 खोके, महाराष्ट्राला देतात धोके :- वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पावरून राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे आंदोलन; बदलापुरात कार्यकर्ते आक्रमक
बदलापूर :- वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला हलविण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने घोरपडे चौक कात्रप येथे आज (23 सप्टेंबर) आंदोलन करण्यात आले.
कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती काँग्रेस, युवक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस बदलापूर शहर आणि ठाणे जिल्हा ग्रामीण च्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत घोषणाबाजी करत राज्यसरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.‘गद्दारांना 50 खोके, महाराष्ट्राला देतात धोके’,‘ ईडी सरकार हायहाय’,‘गुजरात तुपाशी, महाराष्ट्र उपाशी’ अशाप्रकारची घोषणाबाजी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रियंका दामले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले याप्रसंगी ठाणे ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष व अविनाश देशमुख, युवक अध्यक्ष विनय सरदार, संतोष कदम, जितेंद्र पाटील, युवती काँग्रेस च्या हर्षाली गायकवाड यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
काय म्हणाल्या प्रियंका आशिष दामले ?
एक ते दीड लाख रोजगार निर्मिती या उद्योगामुळे राज्यात होणार होती परंतु सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील तरुणांचा रोजगार हिरावला गेल्याने बेरोजगार होण्याची पाळी तरुणांवर आली आहे. राज्यातील सरकार हे निगरगट्ट सरकार असून त्याला जनतेची दया येत नाही. आंदोलनाच्या माध्यमातून तरुण- तरुणींना एकत्रित करण्याचे काम आम्ही पक्षाच्या माध्यमातून करत आहोत.