राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आयोजित रोजगार मेळाव्याला तरुणांचा उस्फुर्त प्रतिसाद
बदलापूर: बदलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्याला तरुणांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. या मेळाव्यात नाव नोंदणी केलेल्या १५० पैकी ८० उमेदवारांना ऑफर लेटर देण्यात आले आहे.
बदलापूर पश्चिमेकडील बेलवली येथील अनंत भवनमध्ये रविवारी (ता.४) सकाळी १० ते दुपारी 3 वा. दरम्यान हा रोजगार मेळावा संपन्न झाला. राष्ट्रवादीच्या ठाणे -पालघर विभागीय महिला अध्यक्ष ऋता आव्हाड यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या रोजगार मेळाव्यात दहावी बारावीपासून पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या बेरोजगार तरुण तरुणींसाठी या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी १५० तरुण तरुणींनी नावनोंदणी केली होती. पहिल्या टप्प्यात संबंधित अस्थापनांच्या अधिकाऱ्यांनी उमेदवारांची शैक्षणिक कागदपत्रे तपासली. त्यानंतर वेगवेगळ्या पदांसाठी त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यापैकी ८० उमेदवारांची निवड करून त्यांना नोकरीसाठी ऑफर लेटर देण्यात आले. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून बदलापूर परिसरातील तरुण तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देता आल्याचे समाधान असल्याची भावना यावेळी कॅप्टन आशिष दामले यांनी व्यक्त केली. किंबहुना तरुण वर्गाचा प्रतिनिधी म्हणून राजकारणात सक्रिय असताना हे आपले कर्तव्यच आहे. त्यामुळे आगामी काळातही बदलापूरातील तरुण- तरुणींना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख, मुरबाड विधानसभा अध्यक्ष शैलेश वडनेरे, माजी नगरसेवक प्रभाकर पाटील, अविनाश देशमुख, डॉ.अमितकुमार गोविलकर,विनय सरदार,रोहित लोंढे, हर्षाली गायकवाड, शिवाजी कराळे, संतोष कदम,अनिल मराडे आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.