कंत्राटी सफाई कामगार पगार घोटाळ्याची चौकशी करा : मनसेची मागणी
बदलापूर : कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या कंत्राटी सफाई कामगारांना त्यांचा हक्काचा पगार, भत्ते व देय असलेल्या इतर सोयीसुविधा न देता त्यांची पिळवणूक केली जात असल्याचा आरोप करून कंत्राटी सफाई कामगारांच्या पगार घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी मनसेने केली आहे.
कंत्राटी सफाई कामगारांवर होत असलेल्या अन्यायाबाबत माहिती देण्यासाठी मनसेच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनसे जिल्हा संघटक उमेश तावडे व महिला शहराध्यक्ष संगीता चेंदवनकर यांनी कंत्राटी सफाई कामगारांची पिळवणूक होत असल्याचा आरोप करून मनसे कंत्राटी सफाई कामगारांच्या पाठिशी ठामपणे उभी राहणार असल्याचे स्पष्ट केले. कंत्राटी सफाई कामगारांना २१ हजार ५०० रुपये पगार आहे. पीएफ व इतर कापून घेऊन त्यांच्या खात्यात दरमहा १६ हजार ५०० रुपये जमा केले जातात. आणि ठेकेदाराच्या माणसांमार्फत या कामगारांना कामावरून कमी करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून ७ हजार रुपये कॅशने घेतले जातात, असे उमेश तावडे यांनी सांगितले. या अन्यायाविरुद्ध आवाज उठविणाऱ्या कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करू नये, त्याना हक्काचा मोबदला मिळालाच पाहिजे. वेळ पडल्यास कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी मनसे आंदोलनात्मक पवित्रा घेऊन संघर्ष करेल असा इशाराही त्यांनी दिला. कंत्राटी सफाई कामगार पुरविण्याच्या कामासाठी ठेकेदार नेमण्यात आलेला असला तरी प्रत्यक्षात काही राजकीय मंडळीच हे काम करीत असल्याचा आरोपही चेंदवनकर व तावडे यांनी केला.
बॉक्स:
सफाई व्यतिरिक्त राजकीय पक्षांची कामे
कंत्राटी सफाई कामगारांकडून साफसफाई व्यतिरिक्त राजकीय पक्षांच्या कार्यक्रमाच्या वेळी झेंडे लावणे, दिवाळीत घरोघरी जाऊन पणत्या वाटणे, समारंभामध्ये भाज्या कापणे, भांडी उचलणे अशी कामेही करावी लागत असून त्यास नकार दिल्यास कामावरून कमी करण्याची व 'शेठ'ला सांगावे लागेल,अशी धमकी दिली जात असल्याचा आरोप या पत्रकार परिषदेत उपस्थित राहिलेल्या काही कंत्राटी सफाई कामगारांनी केला. हा 'शेठ' म्हणजे एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.