पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्तकपिल पाटील यांच्याकडून १२ अंगणवाडी दत्तक
भिवंडी लोकसभा मतदारसंघात ७२ हजार झाडे लावणार
भिवंडी, : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून १२ अंगणवाडी व क्षय रोगाचे १०० रुग्ण दत्तक घेण्यात आल्या आहेत. या अंगणवाड्यांमधील सर्व मुलांना दर्जेदार सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोकसभा क्षेत्रात सुमारे ७२ हजार झाडे लावण्यात येणार आहेत.
पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून पाळला जात आहे. त्यानुसार भाजपा ठाणे ग्रामीण महिला मोर्चाच्या वतीने भिवंडी तालुक्यातील सरवली येथील अंगणवाडी दत्तक घेण्यात आली आहे. त्यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील बोलत होते. या वेळी आमदार व महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा शीतल तोंडलीकर, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती श्रेया गायकर, पंचायत समितीचे सभापती सुरेंद्र भोईर, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा रविना जाधव आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. या वेळी पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडून आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात रुग्णांच्या तपासणीबरोबरच विविध रोगांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
भिवंडी लोकसभा मतदारसंघाबरोबरच देशभरात आजपासून विविध सेवाभावी कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणी रक्तदान शिबिरे भरविली असून, त्याला विक्रमी प्रतिसाद मिळत आहे. आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर अंगणवाडीतील मुलांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. सरवलीप्रमाणेच माझ्याकडून १२ अंगणवाड्या दत्तक घेतल्या आहेत. तसेच क्षय रोगावरील १०० रुग्णांना दत्तक घेऊन उपचारासाठी साह्य केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ७२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून भिवंडी लोकसभा मतदारसंघात ७२ हजार झाडे लावण्यात येतील, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली. भिवंडीतील वृक्षारोपणाची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिल्यानंतर, त्यांनी भाजपाचे खासदार व आमदारांनाही प्रत्येकी ७२ हजार झाडे लावण्याची सुचना केली आहे. त्यामुळे पर्यावरण राखण्यास मदत होईल, असे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले.