मनविसेच्या जिल्हाध्यक्षपदी धनंजय गुरव यांची नियुक्ती!
मनविसे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांनी दिलं नियुक्तीपत्र
ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर
अंबरनाथ : मनसे विद्यार्थी सेनेच्या कल्याण लोकसभा जिल्हाध्यक्षपदी धनंजय गुरव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनविसे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांनी आज नियुक्तीपत्र देत गुरव यांची नियुक्ती जाहीर केली.
धनंजय गुरव हे मनसेच्या स्थापनेपासून पक्षात कार्यरत असून २००७ पासून त्यांच्यावर मनविसेच्या अंबरनाथ शहराध्यक्ष पदाची जबाबदारी होती. त्यांच्या १५ वर्षांच्या शहराध्यक्षपदाच्या कारकिर्दीत त्यांनी अंबरनाथ शहरात विद्यार्थीहितासाठी अनेक उपक्रम राबवले, तसेच अनेक आक्रमक आंदोलनेही केली. अमित राज ठाकरे यांनी मनसेच्या विद्यार्थी सेना अध्यक्षपदाची धुरा हाती घेताच त्यांनी ठाणे जिल्ह्यातील सर्व शहरांचा दौरा केला होता. यामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासोबतच त्यांनी शहरातील पदाधिकाऱ्यांशीही चर्चा केली होती. तेव्हापासूनच ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची फेररचना होणार असल्याची चर्चा होती. अखेर आज राजगड या मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात धनंजय गुरव यांना कल्याण लोकसभा क्षेत्र जिल्हाध्यक्ष म्हणून बढती देण्यात आली. मनविसे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांच्या हस्ते गुरव यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं. यावेळी ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्यासह मनविसेचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, मनविसेचे अंबरनाथ शहर उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले सचिन आंबोकर यांची मनविसे अंबरनाथ शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तर मनविसेचे सध्याचे जिल्हाध्यक्ष कौस्तुभ देसाई यांना महाराष्ट्र सरचिटणीस पदावर बढती देण्यात आली असून मनविसेचे उल्हासनगर शहर अध्यक्ष असलेले मनोज शेलार यांना जिल्हा संघटक पदी बढती देण्यात आली आहे. धनंजय गुरव यांच्या जिल्हाध्यक्षपदी झालेल्या नियुक्तीनंतर पक्षस्थापनेपासून एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्याला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
----------------------------------------------