भातुकली खेळाचे महत्व सांगणारा बालगणेश
बदलापुरातील नरेकर कुटुंबियांनी साकारला भातुकलीचा देखावा
बदलापूरः मोबाईल, इंटरनेटच्या युगात पारंपरिक खेळांचे महत्व कमी होऊ लागले आहे. आयुष्याला आकार देणारे भातुकलीसारखे खेळ विस्मरणात जात असताना या खेळांना नवसंजीवनी देणारे प्रयत्न होण्याची गरज आहे. हीच गरज ओळखून बदलापुरातील नरेकर कुटुंबियांनी यंदाच्या गणेशोत्सवात भातुकली खेळणाऱ्या बालगणेशाचा देखावा साकारला आहे. बाल गणेश आणि उंदीर दोघेही भातुकलीचा खेळ खेळणारी सुबक मुर्ती या देखाव्याचे आकर्षण ठरते आहे.
गेली 22 वर्ष घरगुती गणेशोत्सवासोबतच सामाजिक संदेश देण्याची परंपरा बदलापुरातील नरेकर कुटुंबियांनी जोपासली आहे. यंदाच्या वर्षात या कुटुंबाने भातुकली खेळणाऱ्या बाल गणेशाचा देखावा साकारला आहे. या देखाव्यात बाल गणेश आणि त्याचे वाहन असलेला मूषक दोघे भातुकलीचा खेळ खेळत आहेत. या देखाव्यात मागे भातुकलीची भांडी असलेली मांडणी असून चारही बाजूंना भातुकली पसरलेली आहे. गेल्या काही वर्षात पारंपरिक खेळांचे महत्व कमी होते आहे. त्यात भातुकली या खुप जुन्या आणि महत्वाच्या खेळाचाही समावेश आहे. आजच्या लहानग्यांना भातुकली खेळाबद्दल माहिती नाही. त्यांच्या पालकांनी भातुकली खेळली मात्र काळाच्या ओघात ती विस्मरणात गेली. त्यामुळे विस्मरणात गेलेली ही भातुकली या लहानग्यांच्या पिढीला कळावी या हेतूने हा देखावा साकारल्याची माहिती पुंडलिक नरेकर यांनी दिली आहे. भातुकली हा फक्त भांड्यांचा खेळ नाही. तर मोठेपणी जगण्यासाठीचा सराव या भातुकलीतून कळतो. सांघिक भावना, कुटुंब, निर्णयक्षमता, प्रेम, आत्मनिर्भरता अशा अनेक विषयांना भातुकली एकाच वेळी हात घालते. त्यामुळे भातुकलीच्या माध्यमातून होणारे संस्कार लहानग्यांसाठी महत्वाचे आहेत, असेही पुंडलिक नरेकर यांनी सांगितले. भातुकलीतील बऱ्याचशा वस्तू, भांडी यांची जागा नव्या यंत्रांनी घेतली आहे. मात्र जुन्या वस्तू, भांडी आणि ओघाने येणारी परंपराही नव्या पिढीला कळावी हीच आमची इच्छा असल्याचे नरेकर यांनी बोलताना सांगितले आहे. या देखाव्यासाठी शारदा, सागर आणि संगिता नरेकर यांनी मेहनत घेतली असून प्रसिद्ध निवेदिका दिपाली केळकर यांच्या खेळ मांडियेला या पुस्तकातून प्रेरणा घेण्यात आली. देखाव्यातील दोन्ही मुर्ती कोकोपीटपासून बनवल्या असून बदलापुरातील जुने मुर्तीकार रविंद्र कुंभार यांनी त्या साकारल्या आहेत. तर या देखाव्यात मांडलेली तांबे, पितळ, दगड आणि मातीची भांडी ‘निरगी’च्या स्मिता हजारे यांनी उपलब्ध करून दिली आहेत.